Pimpri | ‘आमदार सुनील शेळकेंना मंत्रिमंडळात संधी द्यावी’

वडगाव मावळ,– मावळ विधानसभा मतदासंघातील विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार सुनील शेळके यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण अध्यक्ष संदीप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, तसेच रूपेश घोजगे, साईनाथ गायकवाड, संतोष कोंढरे, विवेक काळोखे, निलेश दाभाडे आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली.
आमदार शेळके यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४ हजार कोटींचा निधी आणून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले आहेत. निवडणुकीत आमदार शेळके यांनी १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला असून अजित पवार यांचे शिलेदार म्हणून आमदार शेळके काम करीत आहेत. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये आमदार शेळके यांना मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे केली आहे.





