वडगाव मावळ – खरेदी-विक्री संघात राष्ट्रवादीचे दुप्पट संख्याबळ असताना भाजपचा अध्यक्ष झाला. खादी ग्रामोद्योग संघातही तसेच घडले. परंदवडी व अजीवली ग्रामपंचायतमध्ये ज्याचे ऐकले त्यानेच भाजपचा सरपंच केला. साळुंब्रे व शिवली सोसायटी तसेच भोयरे ग्रामपंचायतमध्ये आपल्यांनीच गद्दारी केल्यामुळे सत्ता गेली. गेल्या सहा महिन्यांत झालेला हा पराभव भाजपमुळे नाही तर, आपल्यातील गद्दारांमुळे झाला आहे, अशी टीका आमदार सुनील शेळके यांनी केली. मावळ तालुका राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना आ. शेळके म्हणाले की, सहकारी संस्था, सोसायट्या व ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या धक्क्याबाबत आम्ही बोलत नाही, कारवाई करत नाही याचा अर्थ तुम्ही कसही वागाव असाच झाला आहे. भाजप ऐवजी आपलेच गद्दार पक्षाचे उमेदवार पडतात. कोअर कमिटीचा निर्णय मान्य होत नसेल तर बाजार समितीच्या निवडणुकीत तुम्हीच पॅनल द्या, अशी सूचना आ. शेळके यांनी इच्छुक उमेदवारांना केली. बापूसाहेब भेगडे म्हणाले की, संघटित होऊन लढले तर निश्चित यश मिळते. बाजार समिती निवडणुकीत 82 अर्ज आले तरी 18 जणांनाच संधी मिळणार आहे. बबनराव भेगडे यांनी बाजार समितीच्या स्थापनेपासून आढावा मांडत बाजार समितीची सद्यस्थिती व महत्त्व याविषयी माहिती दिली. इच्छुकांनी पक्षाचा निर्णय मान्य करून निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन केले. पक्षाची कोअर कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे गणेश खांडगे यांनी सांगितले. नगरसेवक चंद्रजित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.