अमरावती : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्याअमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांचे पक्षामधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सुचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रविवार 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आमदार खोडके अधिकृतपणे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. सुलभा खोडके ह्या लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असून, त्या अमरावतीमधून अजित पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिव म्हणून ते काम पाहत आहेत.