Satara | आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजीच हॅक केलेले आहे.
त्याचवेळी याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
सुमारे ११ महिन्यानंतर या पेजवर संबंधित हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.
या पेजवरील पोस्ट व मजकुराकडे कोणीही लक्ष देऊ नये, तसेच सोशल मीडियावरील सर्वानीच सदर पेज अनफ़ॉलो करून ब्लॉक करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या Chh.ShivendraRaje Bhonsle या तत्कालीन फेसबुक पेजवर दररोज आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केले जात होते.
मात्र, ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक करण्यात आले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या जनसपंर्क कार्यालयाकडून याबातची रीतसर तक्रार त्याचवेळी सातारा सायबर सेलकडे केली होती.
सदर पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्यास समबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून त्याचवेळी करण्यात आले होते.
पोलिसांकडून हॅकरचा शोध
दरम्यान, सुमारे ११ महिने सदर फेसबुक पेजवर कोणतीही पोस्ट पडली नव्हती मात्र, अलीकडे म्हणजेच दि. २० जुलै २०२४ रोजी दुपारी ३ नंतर या पेजवर हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.
११ महिन्यांनंतर हे पेज ऍक्टिव्ह करून हॅकर त्यावर आता वारंवार अश्लील पोस्ट टाकत आहे. याबाबत पुन्हा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस हॅकरचा शोध घेत आहेत.
फेसबुक, मेटाकडे रिपोर्ट करावा
हॅक झालेल्या या पेजवर पडणाऱ्या पोस्ट किंवा मजकुराशी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले अथवा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कसलाही संबंध नाही.
त्यामुळे सदर पेजवर पडणाऱ्या पोस्टकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स व नागरिकांनी लक्ष देऊ नये,तसेच सोशल मीडियावरील सर्वानीच हॅक झालेले हे पेज अनफ़ॉलो करावे आणि सदर पेज ब्लॉक करण्यासाठी फेसबुक, मेटाकडे रिपोर्ट करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.





