Jamkhed News : आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश! डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला मिळणार गती
Jamkhed News : या बोगद्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यातील सर्वात लांब अशा कुकडी डावा कालव्याला एक जादा आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कर्जत/जामखेड : कुकडी प्रकल्पासाठी राज्य सरकारने चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली असून ५७०४ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे. यामध्ये बहुप्रतिक्षीत डिंभे-माणिकडोह या बोगद्याच्या कामाचाही समावेश आहे. गेल्या ७ वर्षांपासून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे त्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी या डिंभे-माणिकडोह बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार असून यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरिक्त आवर्तन मिळणार आहे. डिंभे-माणिकडोह बोगदा करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्नशील होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्यांनी या बोगद्याला मान्यता मिळवली होती. परंतु नंतर उद्भवलेल्या कोविडच्या संकटामुळे या कामाला गती देता आली नाही. पुढे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यामुळे हे काम थंड बस्त्यातच होते. तरीही तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विखे-पाटील यांच्यासह प्रशासकीय पातळीवरही आमदार रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर सात वर्षांनी का होईना त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
या बोगद्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्यातील सर्वात लांब अशा कुकडी डावा कालव्याला एक जादा आवर्तन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे असे करताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांचा पाण्याचा कोटा अबाधित राहणार असून त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणामध्ये साठविण्यासाठी या बोगद्याचा उपयोग होईल.
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडत असल्याने साधारणपणे हे धरण पाच वर्षातून एकदा भरते. परंतु या बोगद्यामुळे डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे हे अतिरिक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून माणिकडोह धरणात साठवण्यात येणार आहे. त्यामुळे हे धरण दरवर्षी भरणार असल्याने पुढील काळात कुकडी प्रकल्पासाठी पाणी कमी पडणार नाही.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दृष्टीनेही ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने कर्जत तालुक्यातील कुकडीच्या लाभक्षेत्राला दरवर्षी एक अतिरिक्त आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला असता इतर तालुक्यांचा कोटा अबाधित ठेवून कर्जत-जामखेडसारख्या दुष्काळी भागासाठी पाणी आणणे महत्त्वाचे होते, त्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब, अजितदादा आणि नंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांच्यासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या सर्वांचीच याकामी मदत झाली. याबाबत त्यांनी या सर्वांचे आभार मानले.





