जामखेड: आमदार रोहित पवार यांच्याकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती

जामखेड – जामखेड-सौताडा रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोरगरीबांचे अतिक्रमण हटवण्यात आले, मात्र काही ठराविक ठिकाणी रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने आठवड्याभरात उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाचे विशेष पथक मागवण्याचे निर्देश आमदार रोहित पवार यांनी दिले.
गुरुवारी कर्जत येथे सलग आठ तास आमसभा घेऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर शुक्रवारी जामखेड येथेही आमदार रोहित पवार यांनी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी जागेवरच प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले, तर काही प्रकरणांबाबत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी, पंचनाम्याच्या सूचना –
आमसभेपूर्वी आमदार रोहित पवार यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील झालेल्या नुकसानीची काही गावांमध्ये जाऊन पाहणी केली. आमसभेत त्यांनी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि बंधाऱ्यांजवळील भराव वाहून गेल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. पंचनामे करताना नियमांचा बाऊ न करता शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांचा रोष, अधिकाऱ्यांना खडसावले –
पंचायत समिती, कृषी विभाग, पोलिस विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. सौताडा रस्त्याच्या कामातील दिरंगाई, रोजगार हमी योजनेची थांबलेली कामे आणि जनावरांमधील लंपी आजाराच्या लसीकरणाचा अभाव यावर नागरिकांनी तक्रारी केल्या. लंपीच्या लसीकरणाबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिल्याचे समोर येताच आमदार पवार यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून पशुसंवर्धन अधिकारी नसल्याचे समजताच त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना खडसावत तातडीने लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी –
जामखेड नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नागरिकांनी सर्वाधिक तक्रारी मांडल्या. कचरा उचलण्यात टाळाटाळ, चिखलमय रस्ते, तुंबलेल्या गटारी, सांडपाण्याची अनियमित व्यवस्था, मोकाट जनावरे, कुत्र्यांचा उपद्रव आणि पाण्याचा अनियमित पुरवठा यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला. आमदार पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापत, जनतेच्या पैशाचा हा प्रश्न असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली.
आमदारांच्या कार्यक्षमतेने अधिकाऱ्यांची तारांबळ –
आमदार रोहित पवार यांनी सलग दोन दिवस कर्जत आणि जामखेड येथे आठ तास एका जागी बसून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. एक मिनिटही खुर्ची सोडली नाही, याची अधिकाऱ्यांमध्येही चर्चा होती. त्यांच्या या कार्यक्षमतेमुळे अधिकाऱ्यांना पळवाट शोधता आली नाही. परिणामी, हजारो नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले. याबद्दल नागरिकांनी आमदार पवार यांचे कौतुक करत आभार मानले.
अधिकाऱ्यांना इशारा –
नागरिकांना होणारा त्रास पाहून आमदार पवार यांचा संताप अनेकदा अनावर झाला, तरी त्यांनी संयम राखत परिस्थिती हाताळली. मात्र, भविष्यात तक्रारी कायम राहिल्यास याला अधिकारीच जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी दिला. आता प्रशासनाच्या कामकाजात किती सुधारणा होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





