रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने सोपवली मोठी जबाबदारी, महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

BJP Ravindra Chavan : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यांनी त्यांची या पदी निवड केली. याबाबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी माहिती दिली आहे.
सध्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत. पुढील 2 महिने ते या पदावर कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चव्हाण यांच्याकडे पूर्णवेळ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन.@RaviDadaChavan #Bjp #Maharashtra pic.twitter.com/cHhyUAD568
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 11, 2025
भाजपकडून कोणत्याही नेत्याला जबाबदारी देताना ‘एक व्यक्ती, एक पद’ हे धोरण अवलंबवले जाते. सध्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत रवींद्र चव्हाण?
रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते 2009 पासून सलग 4 वेळा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील ते या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. रवींद्र चव्हाण नगरसेवक देखील राहिलेले आहेत. 2005 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानतंर 2007 साली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
2009 मध्ये पहिल्यांदा ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. शिंदे सरकारच्या काळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची संघटनेच्या नियोजनावर देखरेख ठेवण्यासाठी भाजप प्रदेश समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.





