Pune District : आमदार माऊली कटके मैदानात
Pune District : पूर्व हवेली परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असताना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शासकीय योजनांचे लाभ आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न महत्त्वाचे बनले आहेत.

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील सोलापूर महामार्ग परिसरातील विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि विविध तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे, या उद्देशाने कुंजीरवाडी येथे रविवारपासून (दि. 11) ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार आहे.
पूर्व हवेलीतील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, त्यांच्या तक्रारी संबंधित विभागांपर्यंत पोहोचाव्यात आणि प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी पाठपुरावा करता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे.
पूर्व हवेली परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असताना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शासकीय योजनांचे लाभ आणि मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न महत्त्वाचे बनले आहेत. या समस्यांची प्रत्यक्ष माहिती घेऊन संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधणे आणि तक्रारींच्या निवारणासाठी पाठपुरावा करणे, यावर जनता दरबारात भर दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
आमदार माऊली कटके यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 11) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत कुंजीरवाडी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार होणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी चौकात, स्नेहल हॉटेलसमोर आणि आदित्य मेडिकलच्या पाठीमागे हे कार्यालय आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार माऊली कटके यांच्या पुढाकारातून कुंजीरवाडी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या, अडचणी आणि तक्रारी थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडता येणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात.
-युवराज काकडे, सभापती हवेली पंचायत समिती





