MLA Mahesh Shinde : शिक्षण क्षेत्रात ४० हजार कोटींचा महाघोटाळा? आमदार महेश शिंदेंच्या आरोपाने विधानसभेत खळबळ
MLA Mahesh Shinde : शिक्षण संस्था आणि शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने पालकांना लुटल्याचा आरोप; आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे वेधले सरकारचे लक्ष.

MLA Mahesh Shinde – महाराष्ट्रातील शिक्षण संस्था चालकांनी राज्य शुल्क नियामक प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून पालक व विद्यार्थ्यांकडून अवाजवी फी आकारल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मागील काही वर्षांत सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मुद्दा विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. हा मुद्दा आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडत सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.
शिक्षणसंस्थांनी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात फी वसूल केली असून यात संबंधित अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी आ. शिंदे यांनी केली.या मुद्द्यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत असल्याचे सांगितले.
शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना सरकार पाठीशी घालणार नाही, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अवाजवी फी वसुलीच्या आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सरकार या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते आणि एसआयटी चौकशीचा निर्णय घेतला जातो का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.




