पिंपरी | आमदार महेश लांडगे मंगळवारी भरणार उमेदवारी अर्ज

पिंपरी, (प्रतिनिधी) – दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसूबारस दिनाचा शुभमुहूर्त साधून भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल,
शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर हे उपस्थित राहणार आहेत. तर आमदार महेश लांडगे हे भोसरी विधानसभा मतदार संघामधून मंगळवारी (दि.29) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोमवारी सकाळी 9 वाजता लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकरनगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील ’ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
तर यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत लक्षवेधी असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे येत्या मंगळवारी ( दि. 29) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता ही निवडणूक भोसरीचे ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी हातात घेतली असून, उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
भोसरी मतदारसंघांमध्ये भाजपा विकास कामांचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या दहा वर्षातील महत्त्वाचा ठरलेला सरसकट शास्तीकर माफी, गायरानाची जागा शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देणे, समाविष्ट गावांमधील रस्त्यांचा प्रश्न सोडवणे ,
पाण्याची उपलब्धता मोशी कचरा डेपो येेथे वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस निर्मिती, सीएन्डडी वेस्ट प्रकल्प कार्यान्वयीत करणे बफर झोनची हद्दी कमी करणे,
आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आयआयएम कॅम्पस आणि विशेष म्हणजे जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यात येत आहे. यासह विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आले आहेत.





