पुणे जिल्हा | आमदार भरणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

इंदापूर, (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर विधानसभेची उमेदवारी मला देऊन आगामी काळात जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
शुक्रवारी (दि. 25) पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अमोल मिटकरी, तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, श्रीमंत ढोले, दत्तात्रय घोगरे, डॉ. शशिकांत तरंगे, शिवाजी इजगुडे, नवनाथ रुपनवर, शब्बीर शेख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले, पुढील पाच वर्षात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. दहा वर्षे काम करता आले. 2014 ते 19 मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. 2019 ते 24मध्ये मी अडीच वर्षे मी राज्यमंत्री राहिलो. 2019मध्ये करोना संकट होते.
अडचणीच्या काळात लोकांना मदत करण्याचे काम राज्यातील सर्वात मोठे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाले आहे. सहा हजार कोटींपेक्षा अधिक विकास निधी इंदापूर तालुक्यात आणत अनेक विकासाची कामे केली. आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. जंक्शन एमआयडीसीला जागा मंजूर झाली आहे.
शेती महामंडळाची सव्वातीनशे एकर क्षेत्र मंजूर झाले आहे. अनेक कंपन्या या भागात आणन्याचा प्रयत्न आहे. शिरसोडी ते कुगांव भीमा नदीवरील पूल होत आहे.
यामुळे वर्दळ वाढणार असून इंदापूरची बाजारपेठ पाचपट वाढेल. तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून उजनीवरुन योजना आणली होती; मात्र काहींनी सोलापूरकरांचा गैरसमज केल्याने ती आपल्याला रद्द करावी लागली. भविष्यकाळात ही योजना कशी होईल यासाठी प्रयत्न असेल.
माझ्यावर राजकीय षडयंत्र
काही लोक माझ्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यावर आरोप करतात. कामगार शेतकरी साखर कारखान्याचा मलिदा कोणी खाल्ला हे राजकीय षडयंत्र आहे. तालुक्याची मलिदा गँग कोण आहे, हे जनतेला सांगण्याची गरज नाही.
1969 साली त्यांच काय होतं आणि माझं काय होतं. माझा जन्मच बंगल्यात झाला आहे. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला देखील माझ्या कुटुंबाने मदत केली आहे. असे म्हणत भरणे यांनी विरोधक हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका केली.





