शिरूर -विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले यात शिरूरचे आमदार ऍड. अशोक पवार यांना विधानसभेचे अध्यक्ष होण्याचा मानद मिळाला. त्यामुळे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा अभिमान नक्कीच वाढला आहे. मतदारसंघात आज दिवसभर सोशल मीडियात आमदार पवार हे व्यापून गेले होते.
हिवाळी अधिवेशनासाठी आमदार ऍड. अशोक पवार सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा चालवण्यासाठी जबाबदारी आली आणि त्यांनी ती पार पाडली.
अशोक पवार यांना शिरूर-हवेली तालुक्यामध्ये कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जाते. शिरूर हवेली तालुक्यात विकासाची गंगा आणि विकास निधी मोठ्या प्रमाणात आणून मतदारांच्या पसंतीस उतरले आहेत.
आमदार पवार यांनी यंदाच्या पंचवार्षिक काळामध्ये आपल्या स्वभावात, आपल्या कामाच्या स्थितीमध्ये पूर्णपणे बदल केला असल्याचे दिसून येत आहे. विरोधक असो किंवा सरकारी अधिकारी असो आता सर्वांशी त्यांची जवळीक वाढत आहे; परंतु काम टाळणाऱ्या अधिकारी व निकृष्ट काम करणारे ठेकेदार यांच्याबाबत मात्र ते कडक भूमिका घेतात. सर्वसामान्य नागरिक त्यांची कामे प्राधान्याने करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. करोना काळातही मोठी सामाजिक बांधिलकीची कामे गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य पुरवठा, तर परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र त्यांनी काम केले आहे. त्यामुळे परप्रांतीय नागरिकांचेही ते बापू झाले आहेत. शिरूर-हवेली तालुक्यात एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्याचे काम यंदा त्यांनी केले आहे. त्या बरोबर वाघोली ते शिक्रापूर रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत.
नुकतेच विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात प्रभारी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस या सर्वांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना अध्यक्ष महोदय म्हटल्यानंतर शिरूर-हवेली विधानसभेत सर्वसामान्य नागरिक मतदार यांची छाती अभिमानाने फुलली आहे. कालपासून शिरूर- हवेली तालुक्यात अनेकांच्या सोशल मीडियावर अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय लिहिलेले फोटो फिरत आहेत.
विधानसभेमध्ये अध्यक्षांच्या खुर्चीवरून सभा सुनियंत्रित सुरू ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. अधिवेशनासाठी सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी अध्यक्ष म्हणून विधीमंडळाचे कामकाज चालविले. कुठलीही चर्चा ही सुनियंत्रित पद्धतीने चालली तर जनतेच्या अधिकाधिक प्रश्नांवर उत्तम पद्धतीने मार्ग काढता येतो, हे शिरूर हवेलीतील जनतेच्या आशीर्वादाने प्रामाणिकपणे पुन्हा सिद्ध करता आले.
-ऍड. अशोक पवार,
आमदार शिरुर-हवेली मतदारसंघ