नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले असताना, भाजप आमदार आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत थेट वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कळमेश्वरमध्ये बोलताना देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली. “हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत आणि ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना धमकी आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केले. दोन दिवसाआधी कळमेश्वर मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आले होते. त्याला प्रतिउत्तर देताना आशिष देशमुख यांनी ही भाषा वापरली. सद्या नागपूर जिल्ह्यत आशिष देशमुख यांच्या या भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दरम्यान, देशमुख यांनी कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य व इतर योजना कळमेश्वरमध्ये आणायचे असल्याचे सांगून त्यांनी येत्या 2 तारखेला प्रामाणिक उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.