पिंपरी | आमदार आण्णा बनसोडे अजित पवारांच्या बैठकीला दांडी

पिंपरी, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीला पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे गैरहजर होते. त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली; मात्र मी वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही.
तशी मी वरिष्ठांना कल्पना दिली होती, असे सांगत मी काल अजित पवार यांच्यासोबत होतो आणि उद्याही त्यांच्यासोबतच असणार आहे, अशी भूमिका आमदार बनसोडे यांनी मांडली.
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसलेल्या तगड्या झटक्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये बैठक बोलावली
मात्र काहींनी बैठकीला दांडी मारल्याने राजकीय भुवया उंचावल्या. दरम्यान, आण्णा ९बनसोडे यांनी दै. प्रभातशी बोलताना सांगितले की, जेव्हा जेव्हा राजकीय उठाव झाला तेव्हा मी अजित पवारांसोबत होतो आणि उद्याही अजित पवारांसोबत राहणार आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम झाला आहे का? असे विचारले असता ते म्हणले , युतीचा उमेदवार 90 ते 92 हजार मतांनी निवडून आला आहे. त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. ग्रामीण भागामध्ये फरक पडला असला, तरी शहरी भागामध्ये फरक पडलेला नाही.





