‘मिट्टीसे जुडे हैं..’, ही ठरली दिग्दर्शक नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवले आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. अशात नितीन चंद्रकांत देसाईंच्या शेवटच्या फेसबुक पोस्टनेही लक्ष वेधलं आहे.
नेमकी काय आहे फेसबुक पोस्ट
मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असं म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या आणि महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर नितीन देसाई यांनी २६ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी कुठलीही पोस्ट त्यांच्या फेसबुकवर केलेली नाही. आज त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. त्यामुळे हीच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे
दरम्यान, नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले होते. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले मोठे नाव होते. त्यांच्या जाण्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नितिन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता त्यानुसार पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितिन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितिन देसाई हे इंडस्ट्रीतले मोठं नाव आहे. 80 च्या दशकात नितिन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितिन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले.. गेल्या 30 वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितिन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत.





