पुणे जिल्हा | शासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना एमआयटीचे पंख

लोणी काळभोर, (वार्ताहर) – सध्याच्या युगात केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगसारख्या स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणे म्हणजे मायाजालात फसण्यासारखे समजले जाते.
त्यात पदवीपासूनच स्पर्धा परिक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव, अनेक प्रयत्नांनंतरही आलेले अपयश, वाढते वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होतो.
ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होणाच्या स्पप्नांना यशस्वितेचे पंख लावण्याचा संकल्प एमआयटी विद्यापीठाने केला आहे, असे मत एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केले.
डॉ. धर्मपात्रे पुढे म्हणाले, सनदी सेवा परिक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी पदवीनंतर ते दिल्ली अथवा अन्य शहारांत लाखोंचा खर्च करून क्लासेस करतात; परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यातील खूपच कमी विद्यार्थ्यांच्या हाती यश लागते.
परंतु बाकीच्या विद्यार्थांचे पुढे काय होते, याचा विचार आपण कधी करतो का? अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन व त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठीच एमआयटी एडीटी विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली.
बारावीनंतर युपीएससी व राज्यसेवा परिक्षांसह अन्य सरकारी सेवांचा अभ्यास करू पाहाणार्या विद्यार्थ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनासह बी ए एडमिनिस्ट्रेशन या पदवी आणि आणि एम ए पब्लिक एडमिनिस्ट्रेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देणारी एमआयटी एसआयसीएस ही भारतातील एकमेव अग्रगण्य संस्था आहे.
हा अभ्यासक्रम तयार करण्यामागे यूपीएससीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी अग्रवाल, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे व अनेक तज्ञांचे योगदान आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक विकासासाठी एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सदैव कार्यरत आहे.
यासोबतच पदवीनंतर विद्यापीठांमध्ये एमबीए, लॉ, डिझाइन इत्यादी असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहेत.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणार नाहीत, त्यांना इतर खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल.
पुणे ः पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सुजित धर्मपात्रे.



