प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर सिनेमापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. आयुक्तांनी बुधवारी रात्रीच या “मिशन’चे फर्मान सोडून गुरुवारी सकाळच्या आत खड्डे बुजविण्यास संबंधितांना बजावले होते. विद्यापीठ चौकात उड्डाणपुल होणार असून, त्याचे काम गणेशोत्वानंतर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून या ठिकाणी रस्ता रुंदीकरण तसेच इतर केली जाणारी कामे अर्धवट आहेत. सोबतच या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने “एक किलोमीटर अंतरासाठी एक तास’ या वृत्ताद्वारे समोर आणली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअर सिनेमापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला तातडीने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या चौकात पाषाण आणि बाणेरकडे जाण्यासाठी उड्डाणपुल असून, औंधकडून येण्यासाठी आणि जाण्यासाठी भुयारी मार्ग असणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी या चौकात येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रूंदीकरण केले जाणार आहे. मात्र, हे काम अर्धवट असल्याने तसेच या विद्यापीठ ते ई स्क्वेअरपर्यंत पुलाचे काम सुरू होणार असल्याने या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची कामे पालिकेने केलेली नाहीत. परिणामी या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले असून, रस्तेही असमतोल झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असून, वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब दैनिक “प्रभात’ने समोर आणल्यानंतर तसेच ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले. चार पथकांची नेमणूक महापालिकेने हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी चार पथकांची नेमणूक केली आहे. या पथकांच्या माध्यमातून विद्यापीठ चौक ते ई-स्क्वेअरपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचे खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यात जवळपास 80 ते 90 मोठे खड्डे आढळून आले होते. रात्रीच्या वेळी पाऊस असल्याने महापालिकेने सकाळी पाऊस थांबताच पुन्हा तातडीने कामाला सुरुवात केली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी लहान लहान खड्डे असल्याने ते दुरुस्त केले तरी पुन्हा उखडत असल्याने महापालिका प्रशासन आणि “पीएमआरडीए’ने एकत्र पथक तयार करून अशा खड्ड्यांची दुरुस्ती पेव्हींग ब्लॉकने करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबताच हे काम करून रस्ते पूर्ववत केले जाणार आहेत.