प्रभात वृत्तसेवा पुणे : आधीच चार सदस्यांचा प्रभाग, त्यात प्रभागातील मतदारसंघात १ लाखांपेक्षा अधिक मतदार आणि प्रचाराला मिळणारे अवघे अकरा दिवस, यामुळे महापालिका निवडणुकीत मोठया राजकीय पक्षांसह, अपक्ष आणि चिन्ह नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ३ जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतीम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. १३ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवघे अकरा दिवसच मिळणार आहेत.महापालिकेच्या येत्या जानेवारीत होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाकने जाहीर केले आहे. महापालिकेच्या निवडणुका ४ सदस्य प्रभाग पध्दतीने होणार आहेत. यात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रभाग रचना करताना २०१७ च्या जुन्या प्रभागांना नवीन समाविष्ट गावांशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग छोटे झाले असून उपनगरांमधील प्रभागांचा आकार मोठा झाला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना प्रचारासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे प्रभाग रचनेनंतरच स्पष्ट झाले होते. त्यावेळी प्रचारासाठी किमान १५ ते २० दिवस मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात आयोगाकडून प्रचारासाठी केवळ अकरा दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच कोंडी होणार आहे. दहा प्रभागात लाखाहून अधिक मतदार महापालिकेसाठी एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार हे मतदान करू शकणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर- पाषाण हा सर्वाधिक १ लाख ६० हजार २४२ मतदारांचा आहे. सर्वात कमी ६२ हजार २०५ मतदार हे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर येथे आहेत. एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमधील मतदारांची संख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. तसेच या प्रभागांचे क्षेत्रफळही जास्त असल्याने उमेदवारांना दिवसाला सुमारे ८ ते ९ हजार मतदारांचा भाग पिंजून काढावा लागणार आहे. ज्या पक्षांना स्वत:चे चिन्ह आहे, त्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज भरल्यानंतरच प्रचार सुरू करता येणार असला तरी अपक्ष, चिन्ह नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांना ४ जानेवारी नंतरच प्रचार करता येणार आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम मतदार यादी ३ जानेवारीला जाहीर होणार असल्याने त्यापूर्वी अपक्ष, चिन्ह नसलेल्या उमेदवारांना काहीही करता येणार नाही.