पुणे | हरवलेल्या मुलाचा जबलपूर येथे लागला शोध

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरातून रागाच्या भरात चार महिन्यांपूर्वी गेलेला मुलगा अखेर मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सापडला. त्याच्या शोधार्थ खुद्द पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेतला होता.
तो हरवल्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, तसेच पोलिसांनी इतर राज्यांतील पोलिसांच्या ग्रुपवरही त्याची माहिती पाठवली होती. यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस पथकाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या वडिलांची छोटी सुरक्षा एजन्सी आहे, तर आई हॉटेलमध्ये पोळ्या पुरवण्याचे काम करते.
मुलाने नुकतीच नववीची परीक्षा दिली होती. मात्र, घरात त्याला रागावल्याने तो रागाच्या भरात निघून गेला होता. त्याच्याकडे फोन नसल्याने तांत्रिक तपासाचा प्रश्नच नव्हता. सीसीटीव्हीमध्येही तो पद्मावतीनंतर पुढे कुठेच दिसला नाही.
त्याच्या शोधार्थ पोलीस पथके होतीच, तसेच नागरिकांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकून आवाहन केले होते. काही राजकीय नेत्यांनीही पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर खुद्द पोलीस आयुक्तांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात येऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले, तसेच शोधून देणाऱ्यास बक्षीसही जाहीर केले होते.
रेल्वे स्थानकावर करत होता काम
हा मुलगा पुणे रेल्वे स्थानकावरून दिसेल त्या ट्रेनमध्ये बसत जबलपूरला पोहोचला. तेथे रेल्वे स्थानकासमोरच एका दुकानात काम करणाऱ्या मुलांमध्ये मिसळला. त्यांना खोटे सांगून त्यांच्या सोबत काम करू लागला.
तो दुकानातून पाण्याचे बॉक्स घेऊन ते रेल्वे स्थानकावर विकू लागला. एका बॉक्समागे त्याला शंभर रुपये भेटत असल्याने रोजीरोटीचा प्रश्न मिटला होता. त्यामुळे त्याने घरी संपर्क साधण्याचा प्रयत्नच केला नाही.
…असा लागला शोध
मुलाचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी इतर राज्यातील पोलिसांना त्याची छायाचित्रे पाठवली होती. जबलपूर रेल्वे स्थानकावर एका पोलिसाला हा मुलगा पुणे पोलिसांनी पाठवलेल्या छायाचित्राशी साम्य असलेला आढळून आला. अधिक माहिती काढल्यावर त्याची खात्री पटली आणि त्याने स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले यांच्याशी संपर्क साधला.
पुणे पोलिसांचे पथक जबलपूरला गेले. तेथून मुलाला सुखरुप आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार फिरोज शेख, हर्षल शिंदे यांनी केली.





