बॅंकॉक : थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2025 च्या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या एका कार्यक्रमात एक संतापजनक घटना घडली असून, मिस मॅक्सिको असलेल्या स्पर्धकाचा एका अधिकाऱ्याने पाणउतारा केल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. यामुळे अपमान झालेल्या मॉडेलसह इतर मॉडेल्सने देखील त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. एका स्पर्धेदरम्यान मेक्सिकोची मॉडेल फातिमा बॉशचा नवात इत्सरग्रिसिल या अधिकाऱ्याने अपमान केला. मिळालेल्या माहितीनूसार, इत्सरग्रिसिल यांनी एका शूटमध्ये तू उपस्थित का नव्हतीस? असा प्रश्न फातिमा बॉशला विचारला. तसंच फातिमा काही उत्तर देणार त्याआधीच हा अधिकारी म्हणाला आमच्या निर्देशांचं पालन करत नसशील तर तू मूर्ख आहेस. इत्सरग्रिसिल यांचे वक्तव्य फातिमासह इतर स्पर्धकांनी ऐकले व त्या कमालीच्या नाराज झाल्या. त्यामुळे फातिमासह सर्वांनीच ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सध्याची मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केजरही उपस्थित होती. या प्रकरणानंतर तिने देखील कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. स्पर्धकांनी दाखविलेल्या या कृतीचे सोशल मिडीयावर कौतूक होत आहे. मिस युनिव्हर्स ही स्पर्धा २१ नोव्हेंबरला थायलँडमध्ये होणार आहे. त्याआधीच हा वाद झाला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर नवात इस्तरग्रिसिल यांनी माफी मागितली आहे. यापुढे असा प्रकार स्पर्धेत घडणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ. महिलांचा सन्मान आणि त्यांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वतोपरी असल्याचे मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राऊल रोचा यांनी स्पष्ट केले.