– माधव विद्वांस कवी, कथालेखक, कादंरीकार, बालगीतकार, संपादक तसेच बालकुमार-साहित्यिक प्रा. वि. म. कुलकर्णी यांचा आज जन्मदिन. त्यांचे संपूर्ण नाव विनायक महादेव कुलकर्णी. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1917 रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मणेराजुरी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. वर्ष 1940 मध्ये मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते तर्खडकर सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून 1942 मध्ये मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून एम.ए. झाले आणि चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. नंतर बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये 1944 ते 1950 या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी वर्ष 1950 मध्ये “नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रंध लिहून पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले आणि 1977 मध्ये तेथेच निवृत्त झाले. तेथे मराठी विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळले होते. त्यांच्या “लमाणांचा तांडा’, “अणुस्फोट’, “वेसण’, “भट्टी’ यांसारख्या कवितांमधून त्यांनी सामाजिक विषमतेचे व त्यातील वेदनांचे वर्णन केले आहे. त्यांच्या लेखन संपदेमधे पेशवे बखर (ग्रंथसंपादन), न्याहारी (कथासंग्रह), मराठी सुनीत (ग्रंथसंपादन), मुक्तेश्वर सभापर्व (ग्रंथसंपादन), रामजोशीकृत लावण्या (ग्रंथसंपादन), रामसुतकृत साधुविलास (संपादित ग्रंथ) यांचा समावेश आहे. त्यांनी वृत्ते व अलंकार, साहित्य दर्शन या ग्रंथाचे तसेच साहित्यशोभा-वाचनमालेचे संपादनही केलं. त्यांनी ग्रामजीवनावर आधारित “आहुती’ ही कादंबरी लिहिली. बालचमूसाठी त्यांनी अंगत पंगत, चंद्राची गाडी, छान छान गाणी, रंगपंचमी, ललकार हे बालकवितासंग्रह प्रसिद्ध केले. त्यांच्या काव्यसंपदेतील आश्विनी, कमळवेल, पाऊलखुणा, पहाटवारा, प्रसाद रामायण, भाववीणा, मृगधारा असे काव्यसंग्रही प्रकाशित झाले. त्यांच्या अनेक कवितांना बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून स्थान मिळाले आहे. त्यातील एक म्हणजे, “चावडीच्या मागे जुना सरकारी वाडा… अर्ध्या पडक्या भिंतीचा ठार पांढरा केवढा’ या कवितेमधून जुनाट इमरतीमधील शाळा, तिचा गूढ परिसर याचे इतके सुंदर वर्णन केले आहे की तेथील पडक्या भिंती डोळ्या समोर येतात व मैदानातील पिंपळ वृक्ष वाऱ्याने पडतो की काय असे वाटते. त्यांची “शिट्टी कशी वाजे बघा कुक कुक कुक… इंजिनाचा धूर निघे भक भक भक’ ही आणखी एक कविता सध्याच्या बुलेट ट्रेन, वंदे भारत यांच्या जमान्यातही अबाल वृद्धांना आपल्या लहानपणात घेऊन जाते. त्यांची गीते स्वरबद्ध झाली. “आम्ही जवान देशाचे’ हे गीत पंडितराव नगरकर यांनी, “माझ्या मराठीची गोडी’ हे गीत कमलाकर भागवत यांनी तर “माझा उजळ उंबरा’ हे गीत गजानन वाटवे यांनी गायले होते. त्यांना गदिमा पुरस्कार, कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार, दिनकर लोखंडे बालसाहित्य पुरस्कार, उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला. निवृत्तीनंतर ते पुण्याला स्थायिक झाले. 13 मे 2010 रोजी त्यांचे निधन झाले.