इस्लामाबाद – २०२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्तेत आल्यापासून तालिबान सरकार आणि पाकिस्तानमधील संबंध सातत्याने बिघडत आहेत. गेल्या एका वर्षात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर दोनदा हवाई हल्ले केले आहेत. त्याच वेळी, तालिबानी सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून अनेक पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावाही केला आहे. तालिबानशी संलग्न असलेल्या तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने केवळ शेकडो पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले नाही तर अनेक लष्करी तळांना स्फोटकांनी उडवून दिले आहे. अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेवर आल्यानंतर टीटीपी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाकिस्तान सरकारने स्वतः मान्य केले आहे. पाकिस्तानने तालिबानला सत्तेत येण्यासाठी मनापासून मदत केली होती पण आता ते त्यांच्यासाठी भस्मासुर बनले आहे. दरम्यान, मीर अली कराराच्या खुलाशाने पाकिस्तानी लोकांना धक्का बसला आहे. अफगाणिस्तानवर लक्ष ठेवणाऱ्या अफगाण इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानात सत्तेत परतण्यापूर्वी तालिबानने टीटीपी दहशतवादी आणि अल कायदाशी करार केला होता. त्याला मीर अली करार असे नाव देण्यात आले. या करारानुसार, तालिबानने वचन दिले की जर ते अफगाणिस्तानात जिंकले तर ते टीटीपी आणि इतर परदेशी लढवय्यांना पाकिस्तान ताब्यात घेण्यासाठी आणि तेथे शरिया कायदा लागू करण्यासाठी त्यांच्या जिहादमध्ये मदत करतील. अहवालानुसार, टीटीपीने तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांच्याशी हा करार केला आहे. हा तोच हक्कानी आहे जो पाकिस्तानी आयएसआयचा लाडका राहिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मीर अली करारावर टीटीपी, अल कायदाचा कमांडर हाफीज गुल बहादूर यासारख्या लोकांच्या आणि संघटनांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्याकाळात सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा म्होरक्या मुल्ला हैबतुल्लाहचा उजवा हात होता. एप्रिल २०२२ मध्ये जेंव्हा पाकिस्तानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला तेंव्हा तालिबानचा संरक्षण मंत्री आणि मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकुब याने टीटीपी आणि हाफीज गुल बहादुर गटाच्या नेत्यांना समन्स पाठवले होते. हाफीज गुल बहादुरने उत्तर वजिरिस्तानात अनेक वर्षे हक्कानी नेटवर्क आणि अल कायदाचे समर्थन केले आहे.