#IPL2022 #GTvMI : रोहित, किशन चमकले; गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान

मुंबई – कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, टीम डेव्हीड व तिलक वर्मा यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत गुजरातविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 177 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्याने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. यंदाच्या मोसमात सलग आठ पराभवानंतर नववा सामना जिंकलेला मुंबईचा संघ या सामन्यात मात्र, आत्मविश्वासाने उतरला. स्पर्धेत पहिल्यांदाच कर्णधार रोहित व किशन यांनी 74 धावांची दमदार सलामी दिली.
किशन आक्रमक फलंदाजी करत होता, मात्र, त्याने अनावश्यक फटका मारत आपली विकेट बहाल केली. त्याने 45 धावांच्या खेळीत 29 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावला. रोहितही अर्धशतकाच्या जवळ येऊन बाद झाला. त्याला पुन्हा एकदा रशिद खानने बाद केले. गेल्या काही वर्षांपासून रशिद खानने आयपीएल असो वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यात रोहितला सातत्याने सतावले आहे.
रशिदचे गुगली ओळखण्यात याही सामन्यात रोहित चुकला व पायचित बाद झाला. त्याने आपल्या 43 धावांच्या खेळीत 28 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने षटकार मारत थाटात सुरुवात केली मात्र, तो देखील 13 धावांवर परतला. समोरुन कॅरन पोलार्डला रशिदनेच तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र, तिलक वर्मा व टीम डेव्हीड यांनी संघाचा डाव सावरताना संघाला दीडशतकी धावांची मजल मारुन दिली.
तिलक स्थिरावलेला असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्याने 21 धावा केल्या. तो बाद झाल्यावर आलेल्या डॅनियल सॅम्सने निराशा केली. दुसऱ्या बाजूने डेव्हीडने नाबाद 44 धावांची खेळी करताना मुंबईला 20 षटकांत 6 बाद 177 धावांची सुस्थिती प्राप्त करुन दिली. डेव्हीडने आपल्या खेळीत 21 चेंडूत 2 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. गुजरातकडून रशिद खानने 2 गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देत प्रदीप संगवान, लॉकी फर्ग्युसन व अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 6 बाद 177 धावा. (ईशान किशन 45, रोहित शर्मा 43, तिलक वर्मा 21, टीम डेव्हीड 44, रशिद खान 2-24, प्रदीप संगवान 1-23, लॉकी फर्ग्युसन 1-34, अल्झारी जोसेफ 1-41).





