मुंबई: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्यात केवळ हिंदू व्यावसायिकांचीच दुकाने असावीत, मुसलमानांची नसावीत, या भाजप नेते नितेश राणे यांच्या वादग्रस्त मागणीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी राणे यांना त्यांच्या कथित मुस्लीमविरोधी वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण मागण्यासाठी नोटीस बजावणार असल्याची माहिती दिली आहे. प्यारे खान यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना राणे यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने न घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “गेल्या ७० वर्षांपासून मुस्लिमांवर बहिष्कार होत आला आहे, मात्र आता बहिष्कार घालण्यासारखे कोणतेही कारण नाही. त्यांच्या पंक्चरच्या दुकानात, चहाच्या दुकानावर किंवा भाजीपाल्याच्या दुकानावर बहिष्कार घालणार आहात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राणे यांनी मुस्लीम विक्रेत्यांबद्दल केलेले थुंकी लावून सामान विकण्याचे दावे प्यारे खान यांनी फेटाळून लावले. “हे सगळे अफवा आहेत. काही लोक व्हिडिओ बनवून केवळ राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतात. देशभरातील लोक आस्थेने कुंभमेळ्यात येतात. अशावेळी कुणीतरी चिथावणीखोर भाषणं करून लोकांच्या श्रद्धेत अडथळा आणू नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना जाब विचारला जाईल, असे स्पष्ट करत प्यारे खान म्हणाले की, “आम्ही नितेश राणे यांना नोटीस बजावून त्यांच्या वक्तव्यांचा खुलासा मागू. वारंवार अशी वक्तव्ये करणे राज्याच्या विकासाला बाधा आणते, त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत,” असे त्यांना सांगण्यात येईल. या प्रकरणी भाजपाने मात्र राणे यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.