खेळता खेळता अंगावर भिंत पडल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

भिवंडी : भिवंडी शहरातील 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली होती. स्थानिकांच्या मदतीने मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं, परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला असून तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या मागे 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलं या ढिगाऱ्याखाली अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी ( 10 वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर रिजवान अन्सारी (वय 14 वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे दिवानशाह दर्गा रोड परिसरात कोतवाल शाह दर्गाच्या मागे सुमारे 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखाना होता. त्या ठिकाणी कारखाने बंद झाले आहेत.
सध्या विकासाच्या माध्यमातून नवीन कन्स्ट्रक्शन करण्याकरता या कारखान्यावर तोडक कारवाई सुरू आहे परंतु या तोडक कारवाई दरम्यान संपूर्ण कारखाना कमकुवत झाला असून कोणत्याही प्रकारची काळजी विकासकांकडून घेण्यात आलेली नाही. या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रार देखील केली आहे. परंतु जमीन मालक तसेच विकासक यांनी ऐकलं नाही. परिणामी रविवारी सायंकाळी सुमारास कारखान्याची एका बाजूस भिंत अचानक कोसळली.





