माहिती-प्रसारण मंत्रालयाने 22 युट्यूब चॅनेल केले ब्लॉक; 4 पाकिस्तानशी संबंधीत

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधीत दुष्प्रचार करणारे 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत.
IT नियम, 2021 अंतर्गत 18 भारतीय YouTube न्यूज चॅनेल प्रथमच ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानमधील चार यूट्यूब वृत्तवाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत. दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी या YouTube चॅनेलने लोगो आणि टीव्ही न्यूज चॅनेलच्या खोट्या लघुप्रतिमांचा वापर केला होता. याशिवाय तीन ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाइटही ब्लॉक करण्यात आली आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत 18 भारतीय यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर पाकिस्तानचे चार यूट्यूब न्यूज चॅनेलही बंद करण्यात आले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा, परदेशांशी संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार केल्याचा आरोप असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिकृत निवेदनात म्हटलं की बंद केलेल्या YouTube चॅनेलची एकत्रित दर्शक संख्या 260 दशलक्षांपेक्षा जास्त होती. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक YouTube चॅनेल सोशल मीडिया खात्यांद्वारे पोस्ट केल्या जाणार्या “भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विषयांवरील खोट्या बातम्या” प्रसारित करत असत.
काही भारतीय यूट्यूब चॅनेल युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चुकीची माहिती प्रसारित करत करत होते. यातून भारताचे इतर देशांशी संबंध बिघडवण्याचा हेतू होता, असंही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.





