हडपसर : हांडेवाडी रोडवरील श्रीराम चौकात प्रभू श्रीराम यांच्या पूर्णआकृती पुतळ्याचे भूमिपूजन भरत गोगावले, शिवाजीराव आढळराव पाटील, नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले हडपसर – सत्तेत सहभागी झाल्यानंतर लगेचच मंत्री होईल असे वाटले.परंतु, ‘मी मंत्रिमंडळात अजूनही मंत्री झालेलो नाही. मात्र, आता प्रभू श्रीरामाच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. आता मी मंत्री होईन, अशी आशा आहे. येथील महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण होणार आहे. त्यामुळे हे महादेवा, मला मंत्री करा,’ असे साकडे शिवसेनेचे (शिंदे गट) विधानसभेतील प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महादेवाला घातले. ‘मी मंत्री व्हावे, यासाठी सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले. हडपसर-हांडेवाडी रस्त्यावर श्रीराम चौकात शिवसेना शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या शिल्पाचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, रमेश कोंडे, शिवसेना महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, शरद मोहोळ,तुषार हंबीर, लक्ष्मण आरडे आदिंसह शिवसेना पदाधिकारी व नाना भानगिरे यांचा मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीराम भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.चांगल्या कामासाठी पुढे जाणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणे शिवसेनेचे कर्तव्य आहे. प्रमोद भानगिरे निस्वार्थीपणे समाजामध्ये काम करीत असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. महंदवाडीचे महादेववाडी नामकरण करण्यासाठी गती देऊन तेही काम पूर्ण केले जाईल, असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले. मूर्ती लहान पण कीर्ती महान श्रीरामाचा पुतळा उभारण्यासाठी महापालिका व सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. मात्र, एखादं काम मनांवर घेतलं की ते पूर्ण करायचं हा नानांचा स्वभाव आहे.मंत्रालयामध्ये प्रत्येक विभागाकडे जातीने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे.भूमिपूजन झाले असून, येत्या दीड महिन्यातच या ठिकाणी श्रीरामाचे पूर्णाकृती शिल्प बसविण्यात येणार आहे. कचराकुंड्या स्वच्छ करून त्या ठिकाणी वाचनालय आणि सुंदर चित्र साकारून शहराचे सुशोभीकरण कऱण्यात मोलाचा वाटा आहे. एखादे काम हाती घेतले की, ते पूर्ण करण्याचा संकल्प नाना भानगिरे करीत असतात नाना म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे गौरवोद्गार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काढले. हडपसर मतदारसंघात दिड वर्षांत दोनशे कोटींचा निधी श्रीराम चौकाचे नामकरण तसेच चौकात श्रीराम यांचा पूर्णआकृती पुतळा उभारणी करण्यासाठी सन २०१८ ला पालिकेत प्रस्ताव देऊन मंजूर करून घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून व शिवाजीराव आढळराव पाटील भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ फूट लांब आणि २३ फूट उंच असे श्रीरामाचे शिल्प उभारले जाईल, शासनाच्या अटी-नियमांचे पालन करून हे काम होत आहे. लवकरच महंमदवाडीचे महादेववाडी नामकरण करून येथील तुळजाभवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर मतदार संघात दिड वर्षांत सुमारे दोनशे कोटींचा निधी उपलब्ध करून हडपसर, मुंढवा, केशवनगर, मांजरी आणि बारा वाड्यांतील विकास कामे केली जात आहेत. प्रमोदनाना भानगिरे शहर प्रमुख, शिवसेना पुणे शहर