ओझर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ अभियानांतर्गत दोन किलोमीटर अंतराच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत आदित्य वारुळे (मुले गट), सायली बिबवे (मुली गट) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, नारायणगाव बस स्थानक आवारात झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस निरीक्षक जगदेव पाटील, डॉ. अनुष्का शिंदे, सुधाकर लोंढे आदी उपस्थित होते. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सहा वर्ष वयोगटातील मुलांपासून ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सुमारे दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे नियोजन हवालदार दत्ता ढेंबरे , मंगेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे करिअर अॅकॅडमी,नारायणगाव, शिवनेर फाउंडेशन, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, क्रीडा शिक्षक दादू कोठाळे, प्रथमेश वाणी, मुकेश वाजगे,गणेश रोमन यांनी केले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. प्रथम तीन क्रमांकात आलेल्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे : मुले गट : आदित्य आशिष वारुळे, अनुराग उल्हास हांडे, विक्रांत संतोष मधे. मुली गट : सायली विकास बिबवे, प्राची संतोष गाढवे, राणी मच्छींद्र पाथरट.