कार्ला, (वार्ताहर) – राज्यात सध्या सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठाराची सर्वाधिक चर्चा होत आहे. येथील फुलोत्सव पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे धाव घेत आहेत. कास पठारावर रान हळद, आभाळी, भारंगी, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, गेंद, निसर्डी, जरतारी, दीपकाडी, निळकंनी, रानजिरं आदी विविध प्रजातीची रंगीबेरंगी फूल झाडे सप्टेंबर महिन्यापासून बहरतात. हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कास पठारावर जातात. परंतु, मावळातही सध्या एक मिनी कास पठार बहरले आहे. मुंबई पुण्यातील पर्यटकांना कास पठार सारखीच निसर्ग सौंदर्याची अनुभूती लोणावळा शहराच्या जवळ अॅम्बी व्हॅली रोडवर सह्याद्रीचा घाटमाथा असलेल्या आंबवणे परिसरात पाहायला मिळत आहे. राखीव वन असलेल्या या जवळपास २०० ते ३०० एकर परिसरात यावर्षी कारवी प्रकारातील स्थानिक ‘खराळा’ नावाची निळसर रंगाची फूलझाडे बहरली आहेत. यांची उंची २ ते ४ फूट आहे. अगदी तशीच निळ्या रंगाची फूले असणारी खरी कारवी देखील याच परिसरात आहे. वाळल्या नंतर ग्रामीण भागात कारवीचा उपयोग सरपण म्हणून होतो. तसेच परिसरात दरवर्षी बहरणारी सोनकी नावाने ओळखली जाणारी आणि भरपूर प्रमाणात आढळणारी पिवळ्या रंगाची फूल झाडे देखील बहरली आहेत. त्याशिवाय तेरडा (गंगागोवर) मिकी माउस, निसुर्डी व गौरी गणपतीला वापरतात ती शिंदलवण (चोळ्याची फुल) अशी असंख्य फुलझाडे निसर्ग वेड्यांना खेचून घेत आहेत. अशी झाली मिनी कास पठार म्हणून ओळख सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर येथे खऱ्या अर्थाने फुले बहरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे माध्यमिक विद्यालय आंबवणे या शाळेने शाळेपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या याठिकाणी १९ सप्टेंबरला पावसाळी सहलीचे आयोजन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या ठिकाणाची ओळख जगाला नव्याने करून दिली. विद्यार्थी, शिक्षकांचे हे रिल्स, फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि पर्यटकांची पाऊले या मिनी कास पठारकडे वळू लागली.