Karanja Municipal Council : २१ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. या निकालांमध्ये महायुतीमधील भाजप नंबर १, शिवसेना नंबर २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नंबर ३ असे चित्र आहे. या स्थानिक निवडणुकीत तिन्ही पक्षांना चांगले यश मिळाले आहे. या यशाचे गमक म्हणजे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उमेदवारांसाठी मैदानात उतरले होते. त्यामुळेच विजय खेचून आणण्यात तिन्ही पक्षांना यश आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची परिस्थिती या निवडणुकीतही ‘जैसे थे’च आहे. पण या निवडणुकीत MIM ने दमदार एन्ट्री करत वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगरपरिषदेवर नगराध्यक्ष पदासह १६ नगरसेवक निवडणूक आणले आहेत. कारंजा नगरपरिषदेसाठी MIM चे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या आई फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा ११७ मतांनी पराभव केला आहे. एमआयएमने १६ नगसेवक निवडून आणत भाजप आणि राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. भाजपचे १३ नगरसेवकांचा विजय झाला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक नगरसेवक निवडून आला आहे. या निवडणुकीत अपक्षाने बाजी मारली आहे. अपक्ष १ नगरसेवक निवडून आला आहे. थोडक्यात एमआयएम पक्षाने स्पष्ट बहुमत या निवडणुकीत मिळवले आहे. विदर्भातील अनेक ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींवर भाजपने झेंडा फडकला आहे. पण कारंजा नगरपरिषदेत भाजपला १३ जागांवर समाधान मानले लागले आहे. हा निकाल भाजप आमदार सई डहाके यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का देणारा आहे. तसेच वाशिम नगरपरिषदेतही एमआयएमचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. विधानसभेची निवडणूक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविण्यास एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले युसुफ पुंजांनी हे इच्छूक होते. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी नाराज होत एमएआयएमची कास धरली. कारंजा नगरपरिषेदच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या आईला नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवत विजय संपादन करून आपले महत्व अधोरिखेत केले आहे. हेही वाचा : Satara Police: औंध पोलीस ठाण्यातील ‘त्या’ ५१ गाड्यांचा होणार लिलाव? पोलिसांची मालकांना शेवटची नोटीस