दुधाच्या खरेदीदरात लिटरमागे 7 रुपयांची घट होणार

पुणे – करोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील पिशवीबंद दुधाची जवळपास 40 ते 60 टक्के बाजारपेठ थंडावली आहे. दुग्धजन्य पदार्थांचा उठाव पूर्ण थांबला आहे. परिणामी, दुधाच्या खरेदीदरात प्रतिलिटर सात रुपयांची घट होणार आहे. संस्था आठवड्यातून एक ते दोन वेळा शेतकऱ्यांचे दूध नाकारू लागल्या आहेत.याबाबत राज्य शासनाने तातडीने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा दूध व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे.
राज्यात उत्पादित होणाऱ्या 1 कोटी 80 लाख लिटरपैकी एक कोटी लिटर दुधाची पिशवीबंद विक्री होते. उरलेले दुध हे पावडर व अन्य पदार्थांसाठी वापरले जाते. लॉकडाउनमुळे सध्या सरासरी केवळ 50 लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होत आहे. अतिरिक्त दूध हे पावडर निर्मितीकडे वळवण्याचे प्रयत्न होत आहेत, परंतू बेकरी हॉटेल स्वीट होम उद्योग सध्या बंद आहेत.त्याचबरोबर आईस्क्रिम आणि बटर विक्रीही ठप्प आहे पावरडरचे भावही घटले आहेत. राज्यभरातील दूध संस्थांनी आठवड्यातील एक किंवा दोन वेळा दूधसंकलन बंद ठेवण्यास सुरवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच काही खासगी संस्था दुधाचे भाव पाडण्याच्या भूमिकेत असून दरावर सरकारचे नियंत्रण नसल्याने दुधाचे प्रतिलिटर 32 रुपये असलेला दर आगामी काळात पंचवीस रुपयांवर येणार आहे. त्यामुळे सध्या शेतीचे उत्पन्न ठप्प असताना शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून थोडे पैसे मिळत आहेत, पण आता ते सुद्धा कमी झाले तर मोठी अडचण निर्माण होईल.





