Milk Storage: उन्हाळा सुरू झाला की घरातील अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची समस्या वाढते. विशेषतः दूध योग्य पद्धतीने साठवून न ठेवल्यास काही तासांतच फाटू शकतं. अनेकदा सकाळी आणलेलं दूध संध्याकाळपर्यंत खराब होतं किंवा उकळतानाच फाटतं. त्यामुळे केवळ पैशांचंच नुकसान होत नाही, तर घरातील दैनंदिन कामांवरही परिणाम होतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या घरांमध्ये दूध ताजं ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. अनेकांना वाटतं की दूध फाटण्याचं कारण त्याची खराब गुणवत्ता आहे. मात्र, अनेकदा आपल्या छोट्या चुका यामागे कारणीभूत ठरतात. चुकीच्या तापमानात दूध ठेवणं, अस्वच्छ भांड्यात उकळणं किंवा वारंवार गरम करणं यामुळे दूध लवकर खराब होतं. उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे दूध हाताळताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही सोप्या टिप्स पाळल्या तर दूध जास्त वेळ ताजं आणि सुरक्षित राहू शकतं. स्वच्छ आणि कोरड्या भांड्यातच दूध उकळा दूध उकळण्यापूर्वी भांडं व्यवस्थित स्वच्छ आणि पूर्ण कोरडं असणं आवश्यक आहे. भांड्यात राहिलेली आंबट पदार्थांची चव किंवा पाण्याचा ओलावा दूध फाटण्यास कारणीभूत ठरू शकतो. उन्हाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. milk storage दूध जास्त वेळ बाहेर ठेवू नका अनेकजण दूध उकळल्यानंतर ते बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवतात. ही मोठी चूक ठरू शकते. दूध थंड झाल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ठेवावं. जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि दूध खराब होऊ शकतं. दूध वारंवार गरम करू नका दूध खराब होऊ नये म्हणून काही लोक ते दिवसातून अनेक वेळा गरम करतात. मात्र, त्यामुळे दुधातील पोषक घटक कमी होतात आणि दूध लवकर फाटण्याची शक्यता वाढते. जितकं दूध लागेल तितकंच वेगळं काढून गरम करणं योग्य ठरतं. फ्रीजचं तापमान योग्य ठेवा फ्रीज नीट थंड होत नसेल तर दूध पटकन खराब होऊ शकतं. दूध नेहमी फ्रीजच्या आतील भागात ठेवावं. फ्रीजच्या दरवाजाजवळ ठेवलेलं दूध लवकर खराब होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते, फ्रीजचं तापमान साधारण ४ डिग्री सेल्सियस असणं योग्य मानलं जातं. चांगल्या दर्जाचं आणि ताजं दूध वापरा काही वेळा दूध आधीपासूनच खराब होण्याच्या स्थितीत असतं. त्यामुळे नेहमी विश्वासार्ह डेअरी किंवा ब्रँडचं दूध खरेदी करावं. पॅकेटवरील एक्सपायरी डेट तपासणंही महत्त्वाचं आहे. या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्या तर उन्हाळ्यात दूध फाटण्याची समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.