गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठी चकमक; मृतांमध्ये मिलिंद तेलतुंबडेंचा समावेश

गडचिरोली – भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) च्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचा गडचिरोलीत झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. त्याच्यावर 50 लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
तेलतुंबडे याशिवाय माओवाद्यांचे आणखी दोन म्होरकेही या चकमकीत टिपले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात एटापल्ली येथील रहिवासी असणाऱ्या महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा आणि दंतेवाडा येथील मुळचा असणाऱ्या लोकेश उर्फ मंगु पोडियम अशी त्यांची नावे आहेत.
हे दोघे माओवाद्यांच्या गडचिरोली विभागीय समितीचे सदस्य आहेत. गोटा हा कासनसूर दलम्चा सदस्य होता.त्याच्यावर 16 लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले होते. पोडियम कंपनी चारचा कमांडर होता. त्याच्यावर 20 लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
शनिवारी झालेली चकमक तब्बल 10 तास चालली. गढचिरोलीच्या इतिहासातील ही सर्वात दीर्घकाळ चाललेली चकमक होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 कमांडोजची 16 पथके या कारवाईत सहभागी झाली होती. त्यांची संख्या सुमारे 500 होती. माओवादी जंगलात लपल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेळाव्यासाठी सुमारे 100हून अधिक माओवादी जमले होते. त्यात दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य प्रभाकरचा समावेश होता. त्याचा शरीररक्षक या चकमकीत मारला गेला मात्र, प्रभाकर 75 साथीदारांसह पळून गेला.
शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी तेलतुंबडेचा मृतदेह ओळखला आहे, असे गढचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. तेलतुंबडे याचा मृतांत समाव्रेश असल्याची अटकळ शनिवारी बांधण्यात येत होती. मात्र, पोलिसांकडून त्याला दुजोरा मिळत नव्हता.
तेलतुंबडे (वय 58) हा गढचिरोलीत चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या नेत्यांमध्ये सर्वात मोठा होता. बध्दिजीवी आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा तो भाऊ आहे. आनंद यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. त्यातील चार जणींची ओळख पटू शकली नाही. या चकमकीत मारले गेलेल्या सहा पुरूषांची ओळखही रविवारी दुपारपर्यंत पटू शकली नव्हती.
माओवाद्यांच्या कंपनी चार मध्ये कोरची दलमशिवाय कासनसूर दलम आणि टीपगढ दलमचा समावेश होता. हा गट किती मोठा होता असे विचारता गोयल म्हणाले, त्याची निश्चित माहिती आम्हाला मिळाली नाही. मात्र, ज्या अर्थी चकमक एवढ्या दिर्घकाळ चालली त्याअर्थी हा मेळावा मोठा असावा.
घटनास्थळावर सुमारे 100 पिशव्या (सॅक) सापडल्या आहेत. त्यामुळे किमान 100 जण तेथे उपस्थित आहेत, असे मानणण्यास वाव आहे, असे सूत्रांनी सांगितले.
गोयल म्हणाले, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही मोहीम राबवण्यात आली होती. या मेळाव्याची माहिती मिळाल्यानेच ही मोहीम आखण्यात आली. सुरवातील आमच्या सहकाऱ्यांवर गोळीबार झाल, पण त्याला त्यांनी यशस्वी उत्तर दिले. त्यात आमची किमान हानी झाली.
पोलिसांनी जारी केलेल्या यादीनुसार मृतांची नावे (इनामाची रक्कम)
बंडू उर्फ दसलू गोटा(चार लाख), प्रमोद उर्फ दलपत कचलमी (चार लाख), कोसा उर्फ मुसाखी रा. बिसतर (चार लाख), निरो रा. दक्षिण माड, छत्तिसगढ, विमला उर्फ इमला उर्फ कमला उर्फ मानसी बोगा (इनाम चार लाख), चेतन पाडा रा. द. बस्तर (दोन लाख), किशन उर्फ जैमन रा. दर्भा, छत्तीसगढ (आठ लाख), भगतसिंग उर्फ प्रदीप उर्फ तिलक जादे (सहा लाख) सन्नू ऊर्फ कोवची, रा. बस्तर (आठ लाख), प्रकाश उर्फ साधू बोगा (चार लाख) मालचू रा. बस्तर (चार लाख), नवलू राम उर्फ दीपक तुलवी (चार लाख)
भगगसिंग जादे आणि विमला बोगा हे मिलिंद तेलतुंबडेचे शरीररक्षक होते. तर लच्छू हा प्रभाकरचा शरीररक्षक होता. ज्या नक्षलवाद्यांची ओळख पटली नाही ते छत्तिसगढ आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील असावेत. त्यामुळे स्थानिक शरणार्थी नक्षलवाद्यांना त्यांची ओळख लागू शकली नाही.
पोलिसांची प्रकृती स्थीर
या चकमकीत जखमी झालेल्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची पेकृती स्थीर आहे. त्यांच्या जीविताचा धोका टळला आहे, असे अतिरिकत पोलीस आयुक्त समरि शेख यांनी सांगितले.


