Mikheil Kavelashvili : फुटबॉल खेळाडू कावेलाशविली जॉर्जियाचे नवीन अध्यक्ष

टिबिलीस (जॉर्जिया) : जॉर्जियाचे नवे अध्यक्ष म्हणून मिखाईल कवेलाशविली बिनविरोध निवडून आले आहेत. संसदेतील २२५ पैकी २२४ खासदारांनी त्यांना मतदान केले. दिनांक २९ डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होणार आहे. शनिवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत कावेलाशविली हे एकमेव उमेदवार होते. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध मानली जाते आहे.
जॉर्जियाच्या संसदेने सात वर्षांपुर्वी अध्यक्षांची निवड जनतेमधून थेट करण्याऐवजी इलेक्टोरल कॉलेजमधून करण्यसाठीची घटनादुरुस्ती केली आहे. त्यानुसार संसदेच्या ३०० सदस्यांमध्ये ही निवडणूक झाली. जॉर्जियातील विरोधकांनी २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीच्या निकालांचा निषेध करण्यासाठी व्यापक आंदोलनाचा भाग म्हणून संसदेवर बहिष्काराची घोषणा केली.
या निवडणुकीत लाचखोरी आणि दुप्पट मतदान झाल्याचा आरोप आहे. सहा वर्षांपुर्वी निवडून आलेल्या सलोम झुराबिचविली यांनी याच गैरप्रकारांच्या आरोपांमुळे निवडणुकीचे निकाल बेकायदेशीर असल्याचे सांगून अध्यक्षांची निवड संसद सदस्यांमधून करण्याऐवजी जनतेतून करण्याची मागणी केली होती.
अध्यक्षपदी कावेलाशविली यांच्या निवडीमुळे जॉर्जियाच्या जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी संसदेबाहेर फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. युरोपीय संघात सहभागी होण्याची चर्चा थांबवल्यामुळे जॉर्जियात जनआंदोलन सुरू झाले आहे.




