पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मजूर कुटुंबांचे राजस्थानातून स्थलांतर; शेकडो परिवारांनी सोडले गाव,

आग्रा – राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बसई सावंता गावाची पाण्याच्या दुर्भिक्ष्याची कहाणीच काही
वेगळी आहे. पहाटे चार वाजताच गावातील अनेक लोक पाण्याच्या शोधात दोन-अडीच किलोमीटर अंतर
तुडवत जातात. पाण्याचा एक हंडा भरण्यासाठी तीन ते चार तास लागतात. मे महिन्यातील या टळटळीत
उन्हात पाण्याचा शोध ही गोष्टी गावकऱ्यांसाठी अतिशय कष्टाची आणि त्रासदायक बनली आहे.
सगळ्यात दुःखदायक गोष्टी म्हणजे हा त्रास बहुतांश कुटुंबातील महिलांच्या वाट्याला येतो. कुटुंबासाठी पाण्याची व्यवस्था
करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जेव्हा हा सगळा त्रास त्यांना असह्य आणि सहन करण्याच्या पलीकडे
वाटू लागतो तेव्हा नवऱ्याला घेऊन गाव सोडण्याचा पर्याय तिच्यासमोर असतो.
केवळ बसई सावंताच नव्हे तर अनेक गावांना पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागत आहे. मे महिना
उजाडला की, या गावांमध्ये पाण्याचे संकट अतिशय भीषण होते. अशा स्थितीत अनेक विवाहित महिला
पतीला घेऊन उत्तर प्रदेशातील नातेवाईकांच्या घरी आश्रय शोधतात. मग दोन-तीन महिने इथेच राहातात.
नवरा मजुरीची कामे करतो आणि महिला घरातील कामे करतात. पाऊस पडल्यावर ही जोडपी पुन्हा राजस्थानातील त्यांच्या गावी परत जातात.
उत्तर प्रदेशात तात्पुरते स्थलांतर करून आलेल्या जगनेर जवळील नगला पलटू येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेने सांगितले की, राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गावांमध्ये पाण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. उलट राजस्थानात
काही ठिकाणी टॅंकर येतात. त्यांची किंमतही वाढली आहे आणि टॅंकर येण्याची वाट पहात थांबावे लागते. मजुरी करून हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबांसमोर प्रश्न असतो की पाण्याची वाट पाहायची की, कामावर जायला निघायचे.
धौलपूरमधील बसई सांवता येथे राहणारे संजय आणि मीरा हे दांपत्य सध्या नातेवाईकांकडे नगल पलटू येथे
राहात आहे. नगला पलटू येथे मीराची नणंद राहते. त्यांच्याकडे हे दोघे सध्या राहतात. मीरा म्हणते, इथे
पाण्याची व्यवस्था करणे, पाणी भरून ठेवणे यासाठी सहा ते सात लागतात. इतर वेळी मी घरातील कामे करते
आणि पती टाईल्स बसवण्याची कामे करण्यासाठी जातात.
अफसाना बेगम तिचा पती कलुआ खानसोबत राजस्थानातील दौसा येथील नागोरी मोहल्ल्यात राहते. त्यांचा
बांगड्यांचा व्यवसाय आहे. पाण्याच्या टंचाईमुळे ती देखील उत्तर प्रदेशातील नगला पटलू येथे तात्पुरती
राहण्यास आली आहे.





