स्थलांतरित कामगारांची गुजरातमधूनही घरवापसी सुरू

नव्याने लॉकडाऊन लागू होण्याची धास्ती

अहमदाबाद – गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या अचानकपणे वाढू लागल्याने त्या राज्यात नव्याने लॉकडाऊन लागू होतो की काय या शक्‍यतेने अनेक जण धास्तावले आहेत. त्यातून त्या राज्यातून स्थलांतरित कामगारांची घरवापसी सुरू झाली आहे.

मागील वर्षी करोना संकट उद्भवल्यापासून गुजरातमधील बाधितांच्या संख्येने प्रथमच 3 हजारांचा दैनंदिन टप्पा ओलांडला आहे. अलिकडेच गुजरात उच्च न्यायालयाने त्या राज्यातील स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, अल्पावधीचा लॉकडाऊन लागू करण्याचे सुचवले. त्यापाठोपाठ गुजरात सरकारने 20 शहरांत रात्रीची संचारबंदी लागू केली. 

त्यानंतर त्या राज्याच्या सुरत आणि अहमदाबाद शहरांतील स्थलांतरित कामगार अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी कुटूंबीयांसह आपापल्या राज्यांत परतण्याला पसंती दिली आहे. अहमदाबादमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमधील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. तर, सुरतमध्ये त्या दोन राज्यांबरोबरच मध्यप्रदेश आणि झारखंडमधील कामगारांची संख्याही मोठी आहे. 

मागील वर्षी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर स्थलांतरित कामगारांचे मोठे हाल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने अनेकांना लांबवर पायपीट करावी लागली. ते चित्र ताजे असल्याने स्थलांतरित कामगार यावेळी अधिक सावधगिरी बाळगत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.