जोधपूर – भारतीय हवाई दलाचे मिग-27 युपीजी हे लढाऊ विमान राजस्थानमधील जोधपूरजवळ कोसळले. या दुर्घटनेदरम्यान सुदैवान वैमानिकाला कोणतीही इजा झाली नाही. नेहमीप्रमाणे सरावासाठी निघालेल्या मिग-27 विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात हे विमान कोसळले. ही घटना जोधपूरच्या सिरोही जिल्ह्यातील शिवगंज तालुक्यातील गोडाना गावात घडली.
मिग-27 युपीजी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काहीच वेळात वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैमानिकाने तातडीने वायु दलाशी संपर्क साधला. मी 11:45 वाजता गोडाना, शिवगंजजवळ सिरोही गावात 120 किमीच्या वेगाने असल्याची माहिती दिली. यानंतर काहीच क्षणात विमान कोसळले, वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा बचाव केला.
दुर्घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय वायुदलाचा याक्षेत्रातील हा नववा अपघात आहे. जानेवारीपासून भारताने जॅग्वार फायटर-बॉम्बर, दोन मिग-27 युपीजी, दोन हॉक-फायटर, दोन सूर्यकिरण लढाऊ विमानांची तुकडी, मिग-21 बायसन अशी अनेक लढाऊ विमाने गमावली आहेत.