…त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार, लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचा पुनर्उच्चार

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी एकतर्फी विजय मिळवला. या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते नोटाच्या पर्यायाला मिळाली आहेत. अन्य अपक्षांची अनामत जप्त झाली आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती.या निवडणुकीत एकूण 86570 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी ऋतुजा लटके यांना 66530 मते मिळाली तर नोटा म्हणजेच वरील पैकी कोणीही पात्र नाही या पर्यायाला 12806 मते मिळाली.
ही जागा कोणी लढवायची यावर शिंदे गट आणि भाजप यांच्यात सुरूवातीला संभ्रमाचे वातावरण होते. पण भाजपने ही जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु नंतर मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. या निवडणुकीत भाजपचे डिपॉझिट जप्त होणार असल्याच्या धास्तीनेच भाजपने उमेदवार माघारी घेतला अशी ओरड शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. परंतु रमेश लटके यांच्या विधवा पत्नी विषयी सहानुभूती म्हणून आम्ही ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
या विजयानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लढाईची सुरूवात विजयाने झाली आहे. त्यामुळे भविष्यातील लढाईबद्दल मला चिंता नाही. या विजयासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड इत्यादींनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. ते म्हणाले की या निवडणुकीत नोटाच्या पर्यायाला जितकी मते मिळाली तितकीच भाजपची या मतदार संघातील ताकद होती. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चीत होता असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीच्या निमीत्ताने आमच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले. पण हे ज्यांनी केले ते जवळपासही फिरकू शकले नाहीत. भाजपचे नाव न घेता ते म्हणाले की त्यांनी आधी उमेदवार दिला नंतर मागे घेतला. पण यावेळी नोटाला जितकी मते मिळाली तितकीच मते त्यांच्या उमेदवाराला मिळाली असती. या मतदार संघातील निवडणुकीसाठी शिवसेैनिकांमध्ये उत्साहाला उधाण आले होते, पण त्यांनी उमेदवारच मागे घेतल्याने या उत्साहावर पाणी पडले. गुजरात मध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रकल्पांची घोषणा होत आहे त्यामुळे राज्यातही मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.




