Michaela Benthaus – अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या जर्मनीतल्या एका महिलेने अंतराळ प्रवास करून अंतराळ प्रवासाचे आपले स्वप्न साकार केले आहे. अन्य पाच अंतराळवीरांसमवेत या अंतराळ प्रवासावर जाताना या व्यक्तीलाव्हिलचेअरवरूनच जावे लागले होते. व्हिलचेअरवरून अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा मान या महिलेला या निमित्ताने मिळाला. मिशेल बेंथॉस असे या महिलेचे नाव असून सात वर्षांपुर्वी माऊंटन बाईकवरील अपघातामुळे त्यांना अर्धांगवायू झाला आहे. जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या अंतराळ मोहिमेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. शनिवारी टेक्सास येथून त्यांनी या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात उड्डाण केले. अवघ्या १० मिनिटांच्या या अंतराळ प्रवासासाठी मिशेल बेंथॉस यांना अंतराळयानामध्ये बसवण्यासाठी थोडी कसरत करावी लागली. मिशेल यांच्या सहभागासाठी न्यू शेपर्ड ही नवीन कॅप्स्यूल बनवण्यात आली होती, असे ब्लू ओरिजिन कंपनीचे प्रशिक्षक जेक मिल्स यांनी सांगितले. ब्लू ओरिजिनच्या यापूर्वीच्या अंतराळ प्रवासामध्ये अंशतः अपंगत्व, दृष्टीबाधा किंवा कर्णबधीर व्यक्तींना सहभागी करून घेतले गेले होते. आता प्रथमच व्हिलचेअरवरील व्यक्ती या प्रवासात सहभागी झाली होती. दोन वर्षांपुर्वी बेंथॉस यांना या मोहिमेत सहभागी होण्याबद्दल विचारणा झाली होती. मात्र शारीरिक अपंगत्वामुळे अंतराळ प्रवासाचे स्वप्न सोडावे लागणार असे त्यांना वाटले. मात्र ब्लू ओरिजिन कंपनीने त्यांचे हे स्वप्न साकार केले. एका पुर्ण ऍटोमॅटिक कॅप्स्यूलमधून या पाच अंतराळवीरांना पृथ्वीपासून शून्य गुरुत्वाकर्षण क्षेत्र असलेल्या कारमन लाईनपर्यंत नेण्यात आले. तेथून ही कॅप्स्यूल अलगद टेक्सासच्या वाळवंटात उतरली. ब्लू ओरिजिनने आयोजित केलेली ही १६ वी अंतराळ सफर होती. पॉप गायक केटी पार्टी आणि स्टार्टट्रेक मालिकेत कॅप्टन कर्कची भूमिका करणारे अभिनेते विल्यम शॅन्टनर यांनीही अशाप्रकराचा अंतराळ सफरीचा आनंद पूर्वी घेतला आहे.