MI VS PBKS : पंजाब किंग्सचा फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश; मुंबई इंडियन्सवर केली मात

आयपीएलच्या क्वॉलिफायल २ च्या लढतीत पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून पंजाब किंग्जने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. आता ३ जून रोजी याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात पंजाबची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध होईल. विशेष म्हणजे यावर्षी आयपीएलला नवा विजेता मिळणार हे मात्र नक्की.
विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग याला बोल्डने तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त ६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर युवा सलामीवीर प्रियांश आर्य याला अश्विनी कुमारने २० धावांवर बाद करून पंजाबला दुसरा धक्का दिला.सलामीची जोडी बाद झाल्यानंतर जोश इंग्लिस आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सूत्रे हाती घेतली.
ही जोडी धावांचा वेग वाढवणार असे वाटत असताना हार्दिक पंड्याने ८व्या ओव्हरमध्ये जोशला ३८ धावांबाद केले आणि मुंबईला मोक्याच्या क्षणी विकेट मिळून दिली. यानंतर नेहल वधेराने अय्यर सोबत मुंबईच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला. या दोघांनी ४७ चेंडूत ८४ धावांची भागिदार केली आणि पंजाबला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले.
त्याआधी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद २०३ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी ४४ धावा केल्या. तर सलामीवीर बेअरस्टोने ३८ आणि नमन धीरने १८ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले.





