MHT-CET: सीईटी परीक्षेच्या निकालात गैरप्रकार
MHT-CET:

सीईटीने सेलने फेटाळले आरोप; पोलिसांत तक्रार दाखल
MHT-CET: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा दावा करणाऱ्या काही चित्रफिती (व्हिडिओ) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहेत.
इयत्ता बारावीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीत ९८ ते १०० पर्यंत उच्च पर्सेंटाइल मिळाल्याचे दाखवत परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने सायबर पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे.
व्हायरल व्हिडिओंमध्ये बारावी आणि सीईटी, तसेच जेईई परीक्षेतील गुणांच्या फरकावर बोट ठेवत, उच्च पर्सेंटाइल मिळवूनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला नसल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली जात होती. मात्र, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले असून, निवडक आणि अपूर्ण आकडेवारीच्या आधारे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर संशय घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बारावीच्या गुणांचा आणि सीईटीच्या पर्सेंटाइलचा थेट संबंध लावणे अन्यायकारक आहे. राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार बारावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या ३४४ विद्यार्थ्यांना सीईटीत ४० पेक्षा कमी पर्सेंटाइल मिळाले आहेत, तसेच बारावीत ५० ते ६० टक्के गुण असून, सीईटीत ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी ६३ एवढीच आहे. बहुतांश उच्च पर्सेंटाइल मिळवणारे विद्यार्थी हे बारावीत ७५ ते ८५ टक्के गुण मिळवणारे आहेत.
याशिवाय सीईटीत ९५ ते १०० पर्सेंटाइल मिळवणाऱ्या तब्बल ८,१७४ विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेतही ९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाले आहेत. १०० पर्सेंटाइल मिळवणाऱ्या ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असून, उर्वरित दोघांनी अर्ज भरलेला नाही. दोन्ही परीक्षांच्या निकालात मोठी सुसंगती असल्याने गैरप्रकाराचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.





