प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजपचे आक्रमक नेते जयकुमार गोरे यांच्यापुढे म्हसवड नगरपालिकेवर भाजपचा एक हाती झेंडा रोवण्याचे आव्हान आहे. मात्र विरोधकांनी महायुतीला काटशह देण्यासाठी प्रचंड तयारी केल्याने म्हसवड पालिकेचा रणसंग्राम रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.म्हसवड पालिकेत पंधरा वर्ष सत्ताधारी सत्तेत असूनही म्हसवड च्या नागरिकांना काय मिळाले अशी हाळी देत गोरे विरोधक सत्तेत येण्यासाठी एकवटतील अशी चिन्हे आहेत. म्हसवड पालिकेच्या कार्यक्षेत्रात येथील मतदारांना दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत .पालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याचा पुनर्वापर नसणे,शहरातील मंडईची दुरावस्था, वाढती अतिक्रमणे, घटलेला महसूल, सुधारित आकृतीबंधांची गरज, अर्धवट बांधकामांची समाजमंदिरे, अशा अनेक अडचणी म्हसवड नगरपालिकेला भेडसावत आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे म्हसवड नगरपरिषदेत एक हाती सत्तेसाठी प्रचंड आशावादी आहेत. माण तालुक्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीला एक हाती आव्हान देऊन सातत्याने बॅकफूटवर ठेवण्यामध्ये जयकुमार गोरे आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन ताज्या दमाच्या नव्या चेहऱ्याच्या उमेदवारांना संधी दिली जाईल. याबाबत जयकुमार गोरे निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. म्हसवड पालिका रोल मॉडेल बनवण्यासाठी भाजपच्या हातात सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. महायुतीचा धर्म पाळत जयकुमार अजित पवार गट आणि शिंदे गटाला सोबत घेऊन लढणार की एकला चलो रे ची भूमिका बजावणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. महादेव जानकर यांची भूमिका महत्त्वाची.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी भाजप विरोधी गटाला चुचकारत मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे .त्यांनी पालिकेतील दुबार तिबार मतदानावर आक्षेप घेत भाजप सह निवडणूक आयोगावर राळ उठवली होती. पालिका निवडणुकीत बोगस मतदार हाच काहींचा आधार असल्याचा घणाघाती आरोप करून म्हसवड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला पुढच्या बाकावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हसवड शहरांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची व्होट बँक मजबूत आहे. त्यामुळे येथे महादेव जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर.. दुसरीकडे प्रभाकर देशमुख तसेच जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रभाकर देशमुख हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे म्हसवड पालिकेची राजकीय समीकरणे रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहेत. ना. जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गजांची राजकीय समीकरणे अद्याप गुलदस्त्यात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने राजकीय समीकरणे उघड होतील. या सर्व विरोधकांचे आव्हान पेलून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विजयाचे कोणते ट्रम्प कार्ड खेळणार यावर बरीचशी विजयाची समीकरणे अवलंबून आहेत.