प्रभात वृत्तसेवा म्हसवड – मी मंत्री असताना एका वर्षात साडेबारा हजार कोटींची विकासकामे केली होती. ती कामे माझ्या खिशातून नव्हे, तर जनतेच्या करांच्या पैशातून केली. त्यामुळे मी विकास केला, असे कोणी मंत्री म्हणत असेल, तर तो त्याच्या घरातील पैशाने केलेला नाही. मी कधीही मंत्रिपदाचा आव आणला नाही. मला माण तालुका भयमुक्त व दहशतमुक्त करायचा आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून पंतप्रधानांसोबत बसूनच येथील कॉरिडॉरचा पहिला प्रस्ताव दिला होता, असे माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. म्हसवड पालिका निवडणुकीत सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रा. कविता म्हेत्रे, अभयसिंह जगताप, किशोर सोनवणे, तेजसिंह राजेमाने, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, अरविंद पिसे आणि आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. जानकर म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवून म्हसवडकरांनी भाजपविरोधी आघाडी केली आहे. त्यामध्ये समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार मोहिते-पाटील म्हणाले, म्हसवडचा विकास काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात झाला. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असताना, किती विकास झाला, हे लक्षात घ्या. माणगंगा नदीवरील पूल तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने झाला. म्हसवडकरांसाठी पाणी आमच्या माळशिरसमधून येतेय. गार्डनसुद्धा विजयदादांनी मंजूर केले. मात्र, शहरात सध्या ‘मी केलं’चा नारा दिला जातोय. येथील दडपशाही, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी सूज्ञ मतदाररांनी सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी उभे रहावे.प्रभाकर देशमुख म्हणाले, शहरात बसस्थानक पूर्ण व्हायला 15 वर्षे लागली. या कामाला कोणी खोडा घातला, याची माहिती म्हसवडकरांना आहे. शहरात विकास करायचा असेल, तर सर्वांनी आघाडीच्या पाठीशी रहावे. म्हसवडला एमआयडीसी व्हावी. मात्र, त्यासाठी शेतकर्यांच्या जमिनी ओरबाडू नका. त्यांच्याशी चर्चा करून, अडचणी सोडवा.अनिल देसाई म्हणाले, तुम्ही ज्या परिवर्तन पॅनेलला शिव्या घालता, त्या परिवर्तनला आता मांडीवर घेऊन बसलाय. म्हसवडचे वाटोळे परिवर्तन पॅनेलने केले, असे म्हणता. त्याच परिवर्तनचे किती संवगडी आता तुमच्यासोबत का घेतले, ते सांगा. यावेळी अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे, किशोर सोनवणे, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने यांचीही भाषणे झाली. दरम्यान, आघाडीच्यावतीने शहरात पदयात्रा काढण्या आली.