धक्कादायक ! सांगलीमध्ये वीजेचा शॉक बसून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या तिघांबरोबरच त्यांच्या पाठोपाठ आलेल्या कुत्र्याचादेखील मृत्यू झाला आहे. तर लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शेतात जनावरांना चारा काढण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये सुतारकी माळ परिसरातील वनमोरे मळ्यात विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडली होती. शेतात चारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि त्याच्या चुलतभावासह दोन मुलांना शॉक लागून तीन जण जागीच ठार झाले, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पारिशनाथ मारुती वनमोरे (वय ४०), साईराज वनमोरे (वय १३), प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ वनमोरे वय १४ असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वनमोरे कुटुंबियांसोबत त्यांचा कुत्राही शेतात गेला होता. मालकांच्या पाठोपाठ चालणारा कुत्राही या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे. या प्रकरणामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित वीज महावितरण कंपनीवर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.





