मुंबई: म्हाडा कोकण मंडळाने (MHADA News) ठाणे, वसई आणि सिंधुदुर्ग येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 5,285 सदनिका आणि 77 भूखंडांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेल्या या घरांसाठी अर्ज करण्याची (MHADA News) अंतिम मुदत आता 12 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. याशिवाय, अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने 13 सप्टेंबर 2025 आणि RTGS/NEFT द्वारे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येणार आहे. ही सोडत 9 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येणार असून, याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. सोडतीसाठी आतापर्यंत 1.49 लाख अर्ज 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत या सोडतीसाठी 1,49,948 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1,16,583 अर्जांसह अनामत रक्कम जमा झाली आहे. सर्व पात्र अर्जदारांची प्रारूप यादी 22 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) प्रसिद्ध होईल. या यादीवर दावे आणि हरकती 24 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदवता येतील. अंतिम यादी 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता जाहीर होईल, तर सोडतीचा निकाल 9 ऑक्टोबर 2025 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. यशस्वी अर्जदारांसह प्रतीक्षा यादीतील नावेही याचवेळी जाहीर होतील. सोडतीतील घरांचे वर्गीकरण 1. 20 टक्के सर्वसमावेशक योजना : 565 सदनिका 2. 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना : 3,002 सदनिका 3. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (विखुरलेल्या सदनिका) : 1,677 सदनिका 4. म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना (50 टक्के परवडणाऱ्या सदनिका) : 41 सदनिका 5. भूखंड योजना : ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड या घरांचे दर परवडणारे असून, ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई येथील मोक्याच्या ठिकाणी या सदनिका उपलब्ध आहेत. भूखंड योजनेसाठीही नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अर्ज प्रक्रिया आणि हेल्पलाइन म्हाडाच्या कोकण मंडळाने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 15 जुलै 2025 रोजी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली. यापूर्वी 28 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा 12 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांना अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी 022-69468100 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल. म्हाडाने अर्जदारांना केवळ अधिकृत संकेतस्थळ (https://housing.mhada.gov.in) वरूनच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना परवडणारी घरे मिळण्याची संधी म्हाडा कोकण मंडळाच्या या सोडतीमुळे ठाणे, वसई आणि सिंधुदुर्ग येथील मोक्याच्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घरे आणि भूखंड मिळण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. या योजनेच्या पारदर्शक प्रक्रियेमुळे अर्जदारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. 9 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.