प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडा पुणे विभागाने 4 हजार 186 घरांसाठी सोडत घेण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीमध्ये संपूर्ण राज्यातून नागरिकांचे एकूण २ लाख १५ हजार ९६५ अर्ज प्राप्त झाले आहे. त्याची छाननी प्रक्रिया गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. म्हाडाच्या ४ हजार १८६ सदनिका वाटपाचा ऑनलाइन सोडत (लकी ड्रॉ) कार्यक्रम डिसेंबर महिन्यात घेण्याचा म्हाडाचा प्रयत्न होता. मात्र, लगेचच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने सोडत घेण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होऊन सोडतीस परवानगी मिळावी, अशी मागणी म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही वाघमारे यांना देण्यात आले आहे. यावर वाघमारे यांनी तत्काळ राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.