प्रभात वृत्तसेवा पुणे – म्हाडाने पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि पीएमआरडीएमधील 6 हजार 168 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी अर्ज करण्यासाठी दि. 21 नोव्हेंबर, 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे बऱ्याच अर्जदारांनी कागदपत्रांची पडताळणीसाठी अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली असून, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद भेटला आहे. मात्र, अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अनेक नागरिकांकडून करणे बाकी आहे. तसेच, काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणे सुद्धा बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी म्हाडाकडे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून म्हाडाने 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.