गॅल्व्हेस्टन (अमेरिका) : मेक्सिकोच्या नौदलाचे छोटे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान ५ ठार झाले आहेत. एका रुग्णाला उपचारांसाठी घेऊन जात असताना हा अपघात झाला. या विमानात रुग्णाशिवाय अन्य ७ जण होते. गॅल्व्हेस्टनच्या किनाऱ्याजवळ हे विमान कोसळले असल्याचे समजल्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरू केले गेले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानामध्ये असलेल्यांपैकी चौघे नौदलाचे अधिकारी होते. तर अन्य चौघे सामान्य नागरिक होते. त्यांच्यामध्ये एक लहान बालकाचाही समावेश आहे, असे मेक्सिकोच्या नौदलाने म्हटले आहे. दोन प्रवासी एका स्वयंसेवी संस्थेचे होते. ही संस्था गंभीर भाजलेल्या मेक्सिकन मुलांना मदत गॅल्व्हेस्टन रुग्णालयात नेण्याचा समावेश आहे. सोमवारी दुपारी गॅल्व्हेस्टन बेटाला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या कॉजवेच्या पायथ्याजवळ गॅल्व्हेस्टन बे येथे हा अपघात झाला. या अपघातात किमान ५ ठार झाल्याचे अमेरिकेच्या तटरक्षक दलानेही म्हटले आहे. या अपघातामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.