नवी दिल्ली – लॅटिन अमेरिकेतील मेक्सिकोने शुक्रवारी एकतर्फी भारतीय वस्तूवर आयात शुल्क लावले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असे व्यापार धोरण ठरविण्याबाबत भारत सरकार मेक्सिकोशी चर्चा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेक्सिकोने भारतावरील वस्तूवर आयात शुल्क लावल्यानंतर भारत आपल्या निर्यातदारांचे हितरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची शक्यता आहे. तसा अधिकार भारताने राखून ठेवला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मेक्सिकोने म्हटले आहे की, ज्या देशांचा मेक्सिकोबरोबर मुक्त व्यापार करार नाही त्या देशाविरोधात म्हणजे भारत, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया यांच्याकडून होणार्या आयातीवर शुल्क लावण्यात आले आहे. असे समजले जाते की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोला अशा प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. कारण बर्याच देशांच्या वस्तू मेक्सिकोमार्गे अमेरिकेत जातात. यासंदर्भात मेक्सिकोतील भारतीय वकिलातीने 30 सप्टेंबर रोजी मेक्सिकोच्या अर्थ मंत्रालयाशी संपर्क साधला होता आणि अशा प्रकारचा निर्णय घेण्याअगोदर भारताबरोबर चर्चा करण्याचे आवाहन केले होते. दोन्ही देश परस्परादरम्यान मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा करीत आहेत. या चर्चेची चौकट ठरत असताना एकतर्फी भारतीय वस्तूवर आयात शुल्क लावले असल्याबद्दल भारतातील निर्यातदारांनी असमाधान व्यक्त केले आहे आणि यातून मार्ग काढण्याची सूचना भारत सरकारला केलेली आहे. मेक्सिकोने घेतलेल्या निर्णयानुसार भारतीय वस्तूवर मेक्सिको 5% ते 50% पर्यंत आयात शुक लावणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या या देशाला होणार्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.