पिंपरी -पिंपरी येथून सध्या फुगेवाडीपर्यंत मेट्रो धावत आहे. येत्या काही दिवसांतच मेट्रो शिवाजीनगरपर्यंत धावणार आहे परंतु या प्रवासात मेट्रोला खडकी आणि रेंजहिल्स या स्थानकांवर थांबता येणार नाही. त्यामुळे खडकी आणि रेंजहिल्सला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना पुढील स्थानकावर उतरावे लागणार आहे.
पिंपरी ते शिवाजीनगर प्रवासादरम्यानची खडकी व रेंजहिल्स या दोन स्थानकांची संरक्षण खात्याकडून जागा ताब्यात येण्यास बराचसा कालावधी लागला. त्यामुळे ही स्थानके उभारण्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. परिणामी सध्या तरी ही दोन्ही स्थानके तयार झाली नसल्याने याठिकाणी मेट्रोतील प्रवासी चढू अथवा उतरू शकणार नाहीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका सन 2022 मध्ये सुरू झाली. त्यानंतर आता फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक येथून रुबी हॉल स्थानक या मार्गिका लवकरच प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार. पहिल्या टप्प्यात 12 किलोमीटर अंतरावर मेट्रो सुरू झाली. आता दुसऱ्या टप्प्यात 13 किलोमीटर सुरू होणार आहे, अशी माहिती मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.
या मार्गांवरील कामे अंतिम टप्प्यात
गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी 25 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मार्गावर 31 डिसेंबर 2022 रोजी चाचणी घेण्यात आली. तसेच 30 मार्च 2023 रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मंगळवार पेठ – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. उर्वरित कामे पुढील महिनाभरात पूर्ण होतील. त्यानंतर या मार्गीकाचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात येईल. त्यांची मान्यता मिळताच पुढील मार्गावर मेट्रो धावणार आहे.
विद्यार्थ्यांना होणार फायदा
डेक्कन आणि छत्रपती संभाजी स्थानक ही स्थानके लवकरच प्रवाश्यांसाठी खुली होणार आहेत. यामुळे पीसीएमसी ते जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जाणे सहज शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाद्वारे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून जाणे शक्य होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील बारा किलोमीटरचा मार्ग होणार सुरू
खडकी, रेंजहिल्स ही स्थानके वगळणार
स्थानके तयारच झाली नाहीत